Tuesday, December 24, 2019

लढता लढता शहीद करती

लढता लढता शहीद करती
( पाकिस्तानात जाऊन हल्ला करून आलेल्या भारतीय सैनिक पथकातील एका सैनिकाने टीव्हीवर सांगितले होते की आम्ही शत्रूच्या सैनिकावर उपकार केले आणि त्यांना शहीद व्हायची संधी दिली. या एका वाक्यावरून सुचलेली कविता. )

सैनिक अमुचे संस्काराने परोपकारी
इष्ट चिंतिती त्यांचेही ज्यांच्याशी लढती
मौत मरावी कुत्र्याची ही जरी लायकी
त्या शत्रूंना लढता लढता शहीद करती

जिहाद खाती कशासवे ना कळले ज्यांना
तेच सांगती धर्मांधांना करा तबाही
म्हणे तयांना हजार मिळतिल व्हर्जिन पोरी
मेल्या नंतर जन्नत, देतो खुदा बधाई
भ्रष्ट करोनी मुले धाडती मरण्यासाठी
चिथावणारे जीवन अपुले मजेत जगती

पूर्वज ज्यांचे प्रताप राणा, शिवबा, झाशी
ब्रीद शत्रुला सळो की पळो करावयाचे
मनी नांदते तिव्र भावना एकदा तरी
तळहातावर शीर घेउनी निघावयाचे
त्सुनामीस शत्रूच्या थोपवण्याला सैनिक
अभेद्य कातळ आपुल्याच छातीस बनवती

सहनशीलता नसते लक्षण दौर्बल्याचे
प्रसंग येता रणांगणी आम्हीही लढतो
नापाकांनो ध्यान असू द्या अशी लढाई
अंतिम असते, लढताना इतिहास घडवतो
लपवायाला तोंड, नसावी कुणास जागा
अशी वेळ आणूत निश्चये शत्रूवरती

दुष्ट इरादे पूर्ण करायाला कोल्ह्यांनो
डाग लावले जिहादास कोणी रक्ताचे
गुन्ह्यास नाही क्षमा जगी, वाटते असे की
झूटीस्ताना! घडे तुझे भरले पापाचे
कायनात संपवणे तुमची, कार्य आमुचे
ओझे तुमचे असह्य झाले, कण्हते धरती


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३