Monday, February 4, 2019

मनातून मी उतरत आहे


सभ्यपणाच्या मुखवट्यात मी
मूळ कसा? हे विसरत आहे
तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे

टिळा कपाळी, परडी हाती
कवड्यांची मी माळ घातली
रोज जोगवा मागत फिरतो
पोट भराया वाट गावली
सत्त्य हे तरी, जगदंबेचा
भक्त मला मी समजत आहे
तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे

उजळ असावी प्रतिमा म्हणुनी
स्त्री अन्यायाविरुध्द मोर्चा
उच्च रवाने करीत आलो
रूढ प्रथांच्या विरुध्द चर्चा
बुरसटल्या संस्कारी "मी'ला
प्राणपणाने लपवत आहे
तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे

राष्ट्रामध्ये महाराष्ट्र ही
अदभुत घटना इथेच घडते
राजकारणी देशापेक्षा
मोठा झाल्याचे जाणवते
आमजनांना भूक त्रासते
पण नेत्यांना बरकत आहे
तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे

देव दीन दुबळ्यांचा असुनी
पायरीवरी भीक मागतो
फुटेल पान्हा आज ना उद्या
मनी भाबडी आस ठेवतो
धनाढ्य लोकांच्या नवसांना
देव मंदिरी पावत आहे
 तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे

ढोंग करावे, ढोंग जगावे
आज जाहली आम संस्कृती
आढळली जर पारदर्शिता
तीच वाटते आज विकृती
शुचित्व जपणार्‍या लोकांच्या
असण्यालाही हरकत आहे
तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३