Thursday, June 7, 2018

उघडे ठेवा दार मनाचे

कुंद हवा, जळमटे लोंबणे
लक्षण असते बंद घराचे
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे

घरास पडदे अन् आडपडदे
जगात माझ्या मीच एकटा
विभक्त जगतो, मला न कोणी
मी मोठा अन् मीच धाकटा
जीवन झाले उदासवाणे
एकएकटे गुदमरायचे
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे

मनास येते किती उभारी!
खळखळणारी नदी पाहता
छोट्याशा परिघात तुंबले
जीवन झाले डबके आता
"अवघे विश्वचि घर माझे" या
संस्कृतीस का मिरवायचे?
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे

अंतरात डोकाउन बघता
काळोखाचा ठसा गर्दसा
शोधशोधुनी कुठे दिसेना
अंधुकसाही एक कवडसा
बोगद्यात या असाच जगलो
श्वास घ्यायचे, सोडायाचे
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे

काय लिहावे आत्मचरित्री?
मी, माझी बायको, अन् मुले?
समासही पण पुरून उरतो
नसता दुसरे कुणी आपुले
लिहावयाचे म्हणून लिहितो
आणि शेवटी फाडायाचे
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे

विभक्त जगणे नकोच देवा
पुनर्जन्म दे रे! पक्षाचा
एकएकटे जीवन त्यजुनी
बनेन हिस्सा सदा थव्याचा
निर्मनुष्य का बेटावरचा
सॉक्रॅटिस मी बनावयाचे?
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, June 3, 2018

थकले आता


न्यायाची मी वाट पाहुनी पिकले आता
वेशीच्या बाहेर राहुनी थकले आता

तळातल्या गाळात जात माझी फसलेली
फक्त उपेक्षा पाचवीस असते पुजलेली
वळून मागे काय बघावे? विरान सारे
काळोखाने वाट उद्याची बरबटलेली
श्वास चालतो म्हणून जगणे शिकले आहे
वेशीच्या बाहेर राहुनी थकले आता

शिवाशिवी हे शस्त्र नेहमी वापरताना
स्थान आमुचे पायतळी हे दाखवताना
दंश मारता वखवखणार्‍या नजरा त्यांच्या
काया माझी ओरडते की, सामंतांना
अस्पृशाची नार चालते, कळले आता
वेशीच्या बाहेर राहुनी थकले आता

प्रश्न मनाला एकच आहे ना सुटलेला
जातीवरुनी समाज का हा विभागलेला?
असशीलच तर सांग ईश्वरा कशामुळे रे!
कुणी तुपाशी, कुणी उपाशी, नागवलेला
देव निरुत्तर, प्रश्न अंतरी थिजले आता
वेशीच्या बाहेर राहुनी थकले आता

तळातल्यांचे लिखाण असते धगधगणारे
अन्यायाच्या विरुध्द एल्गाराचे नारे
रुदनांचे आक्रोश जाहले, सनातन्यांनो
नोंद तुम्ही घ्या, ओळखून बदलांचे वारे
पशावरी बलुताच्या जगणे सरले आहे
वेशीच्या बाहेर राहुनी थकले आता


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३