Sunday, December 3, 2017

सूर्य का मला शोधतो आहे ?


अता कुठे सावली मिळाली, चैन भोगतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

रखरख वणवण सदैव असते पाचवीस पुजलेली
आयुष्याची घडी त्यामुळे सदैव विसकटलेली
लगाम घालत आकांक्षांना, मजेत जगतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

जिथे संपतो रस्ता तिथुनी चालू प्रवास होतो
कसे जायचे ध्येय दिशेने, बांधत कयास असतो
अनवट वाटांवरती पाउल खुणा सोडतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

पहिल्या, शेवटच्या श्वासातिल अंतर असते जीवन
त्यात भेटतो कधी उन्हाळा कधी ओलसर श्रावण
दु:ख-वेदनांशी मैत्रीचा सराव करतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

जन्मच झाला मुळी मानवा! जगात रडता रडता
जरी कळाले दु:ख सोबती असेल बसता उठता
हात धुवोनी तरी सुखाच्या मागे पळतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

परावलंबी सुखास हिणकस, भाव केवढा आला!
दु:ख नांदते जगी म्हणोनी जन्म सुखाचा झाला
पर्णफुटीला पानगळीचे फलीत म्हणतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?


निशिकांत देश्पांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

पांडुरंगा


सदैव मनात । दिससी स्वप्नात ।
रंगलो तुझ्यात । पांडुरंगा ॥१॥

नको घरदार । नको येरझार ।
दावा मुक्तिद्वार । पांडुरंगा ॥२॥

मोहविते माया । सोकावली काया ।
जन्म गेला वाया । पांडुरंगा ॥३॥

रमलो नात्यात । आलो मी गोत्यात ।
पाय चिखलात । पांडुरंगा ॥४॥

असू दे उपाशी । रोज एकादशी ।
जागा दे पायाशी । पांडुरंगा ॥५॥

मठ्ठ निर्विकार । तरी मी अधीर ।
जागवी लागीरं । पांडुरंगा ॥६॥

जन्म गेला फुका ।पामराचे ऐका ।
माझा व्हावे सखा । पांडुरंगा ॥७॥

गळा तुझी माळ । तोडली का नाळ ।
तुझाच मी बाळ । पांडुरंगा ॥८॥

करमेना घरी । भाऊबंद तरी ।
रमतो मंदिरी । पांडुरंगा ॥९॥

"निशिकांत" म्हणे । कृपेचे चांदणे ।
होवो माझे लेणे । पांडुरंगा ॥१०॥


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३