Saturday, November 11, 2017

जमवला पसारा किती आपुल्यांचा?


जगी एकटा जन्मतो आणि मरतो
तरी ध्यास का मानवा संचयाचा?
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?

किती मारती डंख आठव सुखांचे !
जसे दु:ख आले मला साथ द्याया
प्रभावी असे वेदना एवढी की !
सुखे कालची लागली मावळाया
कळा अंतवेळी न टळती कुणाला
मनी छंद का पोसला मृगजळांचा ?
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?

प्रयत्ने अथक सोयरा मी यशाचा
घरी राबता नेहमी संपदेचा
मना वाटले, गाठता ध्येय शिखरे
नियंता जणू जाहलो प्राक्तनाचा
कसा काळ गेला? उमगण्या अधी का
दिसे चेहर्‍यावर मळा सुरकुत्यांचा
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?

पहावे वळोनी असे काय मागे?
खरी वर्तमानीच चिंता मनाला
भविष्या! तुझ्या अंतरी गूढ इतके!
कळावे कसे ते मला पामराला?
अनिश्चित असोनी "उद्या" वाटतो का
सहारा उद्याच्या विमा पॉलिसांच्या?
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?

कुठे वाचले, पुण्य जन्मातले या
नवा जन्म मिळताच कामास येते
म्हणोनीच पुण्यार्जनी जन्म गेला
कराया न जमले मनाला हवे ते
ग्रहण लागले जीवनाला असे की
पुनर्जन्म बनला उगम काळज्यांचा
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?

मला वाटले तृप्त जगलो नियंत्या
तरी कावळा का न पिंडास शिवला?
सुखी माणसाचा क्षणार्धात सदरा
कसा हा अचानक असा रे उसवला?
भ्रमासंभ्रमाचेच आयुष्य असुनी
मना मोह पडतो पुन्हा जन्मण्याचा
जगाया पुरे श्वास असला तरी पण
जमवला पसारा किती आपुल्यांचा?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३