Saturday, September 30, 2017

तुझ्या अंतरी एक असू दे


रखरखलेल्या जीवनातही शांत बसोनी मला हसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे

निराकार तू निर्गुणही पण, तरी भरवसा नितांत आहे
गोजिरवाणे रूप कल्पिले, भाव ठेउनी निवांत आहे
तुझ्या कृपेचा प्रसाद माझ्या झोळीमध्ये असू नसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे

उपास, व्रत, वैकल्ये केली, साधण्यास जवळीक तुझ्याशी
जीवन छोटे, अंतर मोठे, नाते जुळले नैरश्याशी
दोष कशाला तुला द्यायचा? माझ्या वरती मला रुसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे

तुझी पताका घेउन देवा अव्याहत मी चालत असतो
काय भले अन् काय बुरे हा विचारही डोकावत नसतो
नसेल जर हे योग्य आचरण, फास गळ्याला घट्ट कसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे

"ब्रह्म सत्य अन् मिथ्या जग" हा विचार भ्रामक आचरल्याने
काय मिळाले? आप्तजनांना सातत्त्याने उपेक्षिल्याने?
आज उपरती झाली, माझ्या अपुल्यामध्य मला फसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे

जसा खोल मी विचार करतो, त्रेधातिरपिट अंतःकरणी
श्रध्देला शह देते लिलया, तर्क सुसंगत विचारसरणी
वैचारिक वादळ शमवाया, संस्कारांना जुन्या पुसू दे
कपार ओली माझ्यासाठी तुझ्या अंतरी एक असू दे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Thursday, September 14, 2017

अस्तित्वाचा तुझ्या दाखला


किती मंदिरे पवित्र क्षेत्रे !
प्रवास केला रुचला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

पूजा अर्चा कर्मकांड अन्
महा आरत्या सदैव होती
नवरात्राच्या एके दिवशी
पशूस एका बळी चढवती
कधी दयाळू भवानीसही
गुन्हा बळीचा कळला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

समान वस्त्रे सर्व घालती
उच्चनीच हा भेद विसरुनी
हज यात्रेचा शेवट करती
सैतानांना खडे मारुनी
पण सैतानी राज्य चालते
भेदभावही सरला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

बालपणीचे श्रीरामाचे
हट्ट बदलले अता एवढे !
हवेच कार्टुन टीव्ही वरती
चंद्र नभीचा ! तया वावडे
निंबोणीच्या आड चंद्रही
अशात गाली हसला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

नवीन व्याख्या लिहू लागलो,
आम्हीच वेडे, कसे जगावे ?
गोंधळलेला पार्थ आजही
पुन्हा जन्मुनी कृष्णा यावे
पाप काय अन् पुण्य काय हा
कधीच गुंता सुटला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही

जीवन अपुले, जगणे अपुले
देव कशाला हवा गड्यांनो ?
जगणे झाले, मरून झाले
जळा चितेवर अता मढ्यांनो
धावा केला सदैव पण तो
विटेवरूनी हलला नाही
अस्तित्वाचा तुझ्या दाखला
कुठेच देवा दिसला नाही


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३