Friday, December 23, 2016

जीवन ताजे ताजे


होते माझे, आहेत माझे, असतीलही माझे
अशाच लोकांसंगे जगलो जीवन ताजे ताजे

वानवा कधी मला न पडली स्नेहाची, प्रेमाची
गरज कधी ना मला भासली अर्थाची, हेमाची
आप्तांच्या या जगात म्हणती मजला राजे राजे
अशाच लोकांसंगे जगलो जीवन ताजे ताजे

तुडुंब भरला डोह अंगणी, आनंदीआनंद असे
आठवणींचे तरंग उठती, भूतकाळही मंद हसे
भविष्यातही सर्व चांगले असेल माझे माझे
अशाच लोकांसंगे जगलो जीवन ताजे ताजे

नात्यांच्या या मळ्यात मिळतो, खूप खूप गारवा
सारे माझे मी सार्‍यांचा, विशाल हा कारवाँ
तृप्त जीवना आपुलकीची किनार साजे साजे
अशाच लोकांसंगे जगलो जीवन ताजे ताजे

माझ्यावरती सदा सावली देवाच्या मायेची
सावलीत त्या नसे काळजी नश्वर या कायेची
बघून माझे भाग्य चमकते, कुबेर लाजे लाजे
अशाच लोकांसंगे जगलो जीवन ताजे ताजे

काय बिघडले हत्ती जर का झुलले नाही दारी?
देव उगा का रुसेल जर मी केली नाही वारी?
सत्कर्माची फक्त तुतारी स्वर्गी वाजे वाजे
अशाच लोकांसंगे जगलो जीवन ताजे ताजे


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३

Thursday, December 15, 2016

जिद्द असावी जगावयाची


दु:ख वेदनांनी भरलेली
सांज असूदे आयुष्याची
पैलतिराची ओढ कशाला?
जिद्द असावी जगावयाची

जीवन गाणे लिहावयाला
शब्दफुले मी वेचवेचतो
रंगसंगती खास योजुनी
माळ फुलांची मस्त ओवतो
रडगाण्यांना असे मनाई
अंगणातही फिरकायाची
पैलतिराची ओढ कशाला?
जिद्द असावी जगावयाची

वर्दळीतही कुटुंबियांच्या
एकटाच मी जरी राहतो
एक कोपरा घरात माझा
आठवांसवे मस्त बोलतो
सवय जडवली बालपणीची
बडबड गीते म्हणावयाची
पैलतिराची ओढ कशाला?
जिद्द असावी जगावयाची

शिशिराची चाहूल लागता
म्हणे कोकोळा मौन पाळते
आम्रमोहरासाठी पुढच्या
वास्तवात ती रियाज करते
सूर न हो बेसूर कधीही
अशीच मैफिल गाजवायची
पैलतिराची ओढ कशाला?
जिद्द असावी जगावयाची

हसणे, रडणे माझे कोणी
वाटुन घेण्या दिसले नाही
भीक मागणे कधी सुखाची
देवा पुढती जमले नाही
असू, नसू दे पंख, नेहमी
मनात इच्छा उडावयाची
 पैलतिराची ओढ कशाला?
जिद्द असावी जगावयाची

बघावयाची वाट कशाला
मरणाची, जे येतच असते
तिरडीवरचे प्रेत कधी का
जीवन सरल्याने हळहळते
सजून जाते, आस धरोनी
पुन्हा नव्याने जन्मायाची
पैलतिराची ओढ कशाला?
जिद्द असावी जगावयाची


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३