Friday, May 27, 2016

कधी खरे वय सांगत नाही


चिरतरुणी तू, तुझ्या जीवनी
काळ पुढे का सरकत नाही?
रूप देखणे, तुझे हासणे
कधी खरे वय सांगत नाही

निळ्या चांदण्यातली सावली
असेच वर्णन तुझे करावे
तुला मिळू दे लाख पौर्णिमा
आवसेचे अस्तित्व नसावे

क्षितिजाच्याही पुढे नांद तू
तोड चौकटी रुढी-प्रथांच्या
घेत भरारी तिथे जा, जिथे
झळा नसाव्या उष्ण व्यथांच्या

कस्तुरीसही हवा हवासा
गंध तुझ्यातिल तारुण्याचा
वसंत रेंगाळतो तुजसवे
छंद तयाला धुंद व्हायचा

देव पावला नसूनसुध्दा
खाष्ट ऋषीला राग न शिवला
तपोभंग केलास मेनके!
तरी भाळुनी मधाळ हसला

गुलमोहरलो, जरी पाहिले
ओझरते मी तुला एकदा
शब्दांकित कवितेत करोनी
रोज वाचतो तुला कैकदा


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, May 24, 2016

वर्ख लावते आनंदाचा

वर्ख लावते आनंदाचा----( ओळखीतली एक वास्तव कथा. नवर्‍याने वार्‍यावर सोडले. झालेली दोन मुले पण दिली नाहीत. आता समाजसेवा करून ती जगायचा प्रयत्न करतेय. तिचे मनोगत. )


व्यक्त व्हावया धडपडणारे दु:ख झाकण्याला
वर्ख लावते आनंदाचा रोज चेहर्‍याला

आयुष्याची वाट अशी का वळणावळणांची?
मला लाभली सदैव संगत खाचा खळग्यांची
चालत असते अखंड, नसतो वेळ थकायाला
वर्ख लावते आनंदाचा रोज चेहर्‍याला

वसंत ज्याच्यामुळे बहरतो, ग्रिष्म दिला त्याने
किती होरपळ सहन करावी एकट्या जिवाने?
अता पानगळ एकच मोसम पुढे जावयाला
वर्ख लावते आनंदाचा रोज चेहर्‍याला

दोन सुगंधित फुले उमलली वेलीवरती पण
नेली हिसकाउन नियतीने, अवघडलेला क्षण
जगते आहे वेल नसोनी अर्थ जगायाला
वर्ख लावते आनंदाचा रोज चेहर्‍याला

चंग बांधला, दु:ख आपुले विसरुन जायाचा
खितपतणार्‍यांना मदतीचा हात द्यावयाचा
कुटुंब झाले विशाल माझे प्रेम करायाला
वर्ख लावते आनंदाचा रोज चेहर्‍याला

समाज सेवेचे व्रत आता ध्येय जाहल्याने
अपुली, परकी मुले असे हे भेद विसरल्याने
थरथरणारी वेल लागली वृक्ष व्हावयाला
वर्ख लावते आनंदाचा रोज चेहर्‍याला

जहाल वास्तव पूर्ण कालचे पचवुन झाल्याने
नवीन वास्तव हवे तसे घडवीन प्रयत्नाने
जिद्दीने मी किती बदलले? प्रश्न विधात्याला
वर्ख लावते आनंदाचा रोज चेहर्‍याला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mai--- nishides1944@yahoo.com