Wednesday, February 17, 2016

विश्व निराळे खुलून दिसते


ओघळणार्‍या आसवातुनी
ओठावरती हास्य झिरपते
हिंदोळ्यावर वसंतऋतुच्या
विश्व निराळे खुलून दिसते

वसुंधरेवर मधुगंधाची
कुणी एवढी केली उधळण?
मनात वेड्या वसंत फुलता
भावफुलांची होते पखरण
प्रीत जागते अशी अंतरी!
तगमगणारे मन मोहरते
हिंदोळ्यावर वसंतऋतुच्या
विश्व निराळे खुलून दिसते

दवबिंदूंचे लेउन मोती
थरथरणार्‍या पात्यांनाही
चाहुल येता वसंतॠतुची
नटावयाची होते घाई
पहाट उत्सव हिरवाईचा
बघून सुकले मन अंकुरते
हिंदोळ्यावर वसंतऋतुच्या
विश्व निराळे खुलून दिसते

वसंत येता कोण व्यापते?
हृदयामधल्या खोल कपारी
सदैव असते सकाळ, गेल्या
रखरखणार्‍या जुन्या दुपारी
आठवणींची तुझ्या सुरावट
ओठावरची गुणगुण बनते
हिंदोळ्यावर वसंतऋतुच्या
विश्व निराळे खुलून दिसते

कृष्ण राधिकेच्या प्रेमाचा
खेळ असावा जसा रंगला
शुध्द प्रीत ती बघून बहुधा
वसंत पहिला असेल फुलला
ऋतुराजाची तरुणाईशी
जन्म कुंडली सुरेख मिळते
हिंदोळ्यावर वसंतऋतुच्या
विश्व निराळे खुलून दिसते

वसंत उत्सव तसे पाहता
मनात अपुल्या नांदत असतो
असून वावर सुखदु:खांचा
आपण पुढती चालत असतो
बेदरकारी जरा पोसणे
आनंदाला पूरक ठरते
हिंदोळ्यावर वसंतऋतुच्या
विश्व निराळे खुलून दिसते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, February 10, 2016

वाढ दिवस

वाढ दिवस-----( pratilipi.com या संकेतस्थळावर प्रकाशित झालेली माझी कथा )


आपल्या देशाची संस्कृती मुळातच उत्सवप्रिय आहे. किती ते सण! वेगवेगळ्या धर्मांचे आणि जातीपंथांचे. सर्व सण उत्साहाने साजरे होतात. आणि मग भरपूर सुट्ट्या पण आल्याच.

साजरे करायला एवढे सण असताना का माहीत नाही वाढदिवस साजरे करणे हा प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहे. मला अजून हे कळले नाही की वाढदिवस साजरे करतातच का! बहुतांश धर्मानुसार माणूस जन्माला आला की त्याचे जगावयाचे आयुष्यही ठरलेले असते. समजा एखाद्याच्या प्राक्तनात सत्तर वर्ष जगायचे असेल तर प्रत्येक वाढदिवसाला त्याचे उरलेले आयुष्य एकेक वर्षाने कमी होते हे सत्त्य आहे. असे उरलेले जगणे कमी होत असेल आणि मृत्यू जवळ असेल तर वाढदिवस ही साजरा करायची घटनाच होऊ शकत नाही. वाढदिवशी खरे तर उरलेल्या जीवनात काय करायचे यावर आत्मचिंतन व्हायला हवे. नवे संकल्प ठरायला पाहिजेत. कांही अतिउत्साही लोक तर आपले वर्षातून दोन दोन वाढदिवस साजरे करतात. एक तिथीप्रमाणे तर दुसरा ईंग्रजी तारखेप्रमाणे! वरतान म्हणजे पुन्हा मोठ्या प्रमाणात साजरे करायचे वाढदिवस वेगळेच. जसे की पन्नासावा, एकसष्टी, पंचाहात्तरावा आणि सहस्त्र चंद्र दर्शन सुध्दा! अरे हो! अजून एक राहिलेच की! लग्नाचा वाढदिवस! आहे ना गंमत!

हे झाले समान्य माणसांचे. मोठ्या माणसांचे/विभूतींचे वाढदिवस तर मेल्यानंतरही साजरे होतात. जसे की गांधी जयंती, महावीर जयंती, बुध्द जयंती, अंबेडकर जयंती वगैरे वगैरे. आणि या जयंत्यांमुळे सुट्ट्यांची रेलचेल. देशाच्या आयुष्यात असे मोठमोठे लोक तर होणारच. आणि सुट्ट्या देऊन जयंत्या साजर्‍या करण्याची प्रथा .आबाधित राहिली तर तर एक वेळ अशी येईल की जयंत्या जास्त आणि वर्षाचे दिवस कमी! म्हणूनच एका गीतकाराने हिंदी सिनेमा साठी हे गीत लिहिले असावे. "तुम जियो हजारो साल, सालके दिन हो पचास हजार"

आता गांधी जयंतीचेच घ्या! आमची जुनी पिढी सोडा. नवी मुले टीव्ही, व्हाट्सअ‍ॅप कार्टून फिल्म्स इत्त्यादी छंदात व्यस्त असतात. त्यांना गांधीजी कोण हे माहीत पण नसते. ना त्यांनी गांधींना पाहिलेले असते ना वाचलेले असते. त्यांचा गांधीजींशी संबंध फक्त सुट्टी पुरताच असतो.

जेंव्हा जेंव्हा वाढदिवसाचा विषय निघतो तेंव्हा तेंव्हा मला माझे जुने शेजारी पाटील यांची आठवण होते. 
अंदाजे वीस वर्षापूर्वी ते आणि मी जवळ जवळ रहात होतो. ते नागपूरला जिल्हाधिकारी होते आणि मी एका राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत होतो. कार्यालयीन कामानिमित्त आम्ही संपर्कात आलो आणि आमची बर्‍यापैकी मैत्री झाली. एकमेकाकडे सपत्निक जाणे येणे सुरू झाले. त्यांचा प्रशस्त बंगला, घराचे विस्तीर्ण कंपाउंड, नोकरचाकरांचा ताफा साराच त्यांचा थाट होता. अर्थात ते आय.ए.यस. ऑफिसर होते! गावातील प्रतिष्ठित लोकांचा त्यांच्या कडे सदैव राबता असायचा. 

त्यांचे कुटुंब तसे छोटे होते. ते स्वतः, त्यांची सुविद्य पत्नी शरयू आणि एक मुलगा सतीश. स्वतः पाटील कर्यालयीन कामात व्यस्त असत. पत्नी आपल्या छंदात व्यस्त असायाची. किट्टी पार्टी, बुधवार क्लब, मैत्रिणी सोबत पत्ते खेळणे छोट्या मोठ्या कार्यक्रमांचे उदघाटन असेच कांही. त्यांच्या रहाणीमानावरून त्या उच्चभ्रू समाजातिल आहेत हे पदोपदी जाणवत होते. त्यांच्या सर्व मैत्रिणी त्यांना आदराने मॅडम म्हणत. त्यांना नावाने कुणीही संबोधत नसत. मुलगा आठवी इयत्तेत एका कॉन्व्हेंट शाळेत शिकत होता. पाटलांचे दोन पिढ्यातिल पूर्वज राजकारणात होते. पण यांनी स्वतः नोकरीचा मार्ग धरला. 'पांचो उंगलियां घी मे" या सदरात मोडणारे हे कुटुंब असल्या मुळे ते उच्चभ्रू समाजात शोभणारे कुटुंब होते.

त्यांच्या घरी एक बारा वर्षाची बिहारी मुलगी घरकामाला होती. तिचे नाव चमेली होते. या मुलीला त्यांनी एका एजन्सी मार्फत कामाला ठेवले होते. वर्षाचा पगार सहा हजार त्यांनी एजन्सीला दिला जो चमेलीच्या आई बापा कडे कमिशन वजा करून जाणार होता. या मोबदल्यात चमेलीने पाटील साहेबाकडे एक वर्ष घरकाम करायचे. सहा हजाराव्यतिरिक्त चमेलीचे जेवण आणि अंगभर कपडे याची जबाबदारी पाटील कुटुंबिया कडे होती. चमेली बंगल्यावरच रहायला असे. चमेलीने आज घाईघईने पाटील साहेबांसाठी नाश्ता बनवला कारण त्यांना "बाल कामगार विरोधी मंच"च्या मिटिंगला संयोजक या नात्याने जायचे होते.

एक सांगायचे राहूनच गेले! या कुटुंबात वरील चार सदस्याशिवाय एक कुत्रा पण होता. त्याचे नाव बॉबी. शरयूला कोणी या प्राण्याला कुत्रा म्हणालेले आवडत नव्हते. तिचा आग्रह असे की त्याला एक तर बॉबी म्हणा किंवा डॉगी म्हणा. तिने मला एकदा अभिमानाने सांगितले होते की बॉबीचे वडील डॉबर मॅन वंशाचे आहेत तर आई भारतीय . एवढी मोठी संकरित जातकुळी आणि उच्च घराण्याने पाळलेला कुत्रा! डौलदार आणि आकर्षक तर असणारच. मला त्या कुत्र्याचा-सॉरी, बॉबीचा- हेवा वाटायचा कधी कधी.
चमेलीचा दिवस, थंडी असो, पाऊस असो लवकर सुरू व्हायचा. सकाळी सहा वाजता बॉबीला फिरवायला चमेली घेऊन जायची. हा फेरफटका अर्ध्या तासाचा असायचा. या वेळी बॉबी आपले प्रातर्विधी उरकून  घ्यायचा. कूळ उच्च असून आणि मालक आय.ए.यस. असूनही दगड दिसला की पाय वर करून.... .शेवटी कुत्रेच ते!

बॉबीला फिरवून आणल्या नंतर इतर खूप कामे ती करत असे. जसे की सगळ्यांसाठी चहा, न्याहरी बनवणे, पाटील आणि सतीश च्या बुटांना पॉलिश करणे, सतिशच्या युनिफोर्म आणि टायला इस्तरी करणे, सतिशचा डबा बनवणे आणि दप्तर बनवणे वगैरे वगैरे.एकदा बाप ल्योक बाहेर पडले की शरयूची कामे सुरू.

तिच्या केसाला तेल लाऊन मसाज करणे, आठ दहा दिवसांनी केसाला डाय किंवा मेंदी लावणे, हेयर ड्रायरने केस वाळवून देणे, स्व्यंपाक करणे अशी अनेक कामे चमेली करत असे. संध्याकाळी पाटील ऑफिसमधून परतल्यावर त्यांना भेटायला खूप लोक यायचे. त्यांची बडदास्त ठेवणे पण तिलाच बघावे लागे. रोज जेवणानंतर झोपायला तिला साडे दहा आकरा वजायचे. अशा तर्‍हेने तिचा दिवस सोळा तासाचा असायचा. रात्री पार्टी असेल तर तिला झोपायला एक पण वाजायचा.

एवढे काम करून ती थकत नसेल का? ऐय्याशी पाटील परिवाराचा तिला तिरस्कार वाटत नसेल का? पण या सहज सुलभ भावनांना तिच्या जीवनात कुठे जागा होती? ती शेवटी एका गुलामाचे जीवन जगत होती. तिचे बालपणच हरवून गेले होते. वय फक्त बारा असूनही ती मनाने आणि स्वभावाने चाळीशीच्या वयाची पोक्त स्त्री होती. चमेलीबद्दल मी थोडे जास्तच लिहिले आहे याचे कारण की ही पूर्ण कथाच तिच्याभोवती गुंफलेली आहे.

 आज पाटलांच्या घरी जरा जास्तच उत्साहाचे वातावरण होते. आज बॉबीचा वाढदिवस होता.बर्थ डे पार्टीसाठी संध्याकाळी खूप लोकांना आमंत्रित केले होते.पार्टीचे जोरदार नियोजन चालू होते.चमेलीला आज खूप काम पडणार होते.शरयूच्या सांगण्यावरून चमेलीने दुपारी बॉबीला इंपोर्टेड शांपूने अंघोळ घातली.उन्हात नेऊन त्याचे केस वाळवले. आज बॉबी जरा जास्तच क्यूट दिसत होता.
जशी संध्याकाळ जवळ येऊ लागली तसा शरयूचा नट्टापट्टा सुरू झाला. भारी साडी, अंगभर दागिने, गाढे मॅचिंग लिपस्टिक. असे वाटत होते की शरयूने ऊंची सेंटची पूर्ण बाटलीच अंगावर ओतून घेतली होती. ती अशी कांही नटली होती की जणू कांही तिचाच वाढ दिवस होता.

चमेली बिचारी कामात मग्न होती. टेबलावर स्नॅक्स मांडणे, सोड्याच्या बाटल्या फ्रीजमधे ठेवणे, बर्फ तयार करणे, ग्लासेस स्वच्छ धुवून पुसून ठेवणे, हजारो कामे. एव्हाना संध्याकाळचे पाच वाजले होते. इतक्यात ब्यूटी पार्लरवाली आली. शरयू तर तयार होऊन बसली होती. नंतर खुलासा झाला की ती बॉबीला सजवायला आली होती. तिने पुन्हा एकदा बॉबीला शाम्पू बाथ दिला. हेअर ड्रायरने केस वाळवले. व्हॅसलीन लावल्यानंतर केस चमकू लागले. शाम्पूच्या अ‍ॅडमधील मुलींसारखे बॉबीचा एकएक केस सुटा दिसू लागला. बॉबीच्या नखाला आकार देऊन नेलपॉलिश लावले. नेलपॉलिशचा शेड निवडण्यासाठी शरयूने अर्धा तास घेतला. शरयूला एकाच गोष्टीचे वैषम्य होते की बॉबीला लिपस्टिक लावले की तो चाटून टाकायचा. शेवटी लिपस्टिक विनाच त्याला पार्टीत सामील व्हावे लागले. हॉलमधे एक मोठा स्टूल ठेवून त्यावर मखमली कपडा टाकून बॉबीला बसवले.

हॉल खूप सुंदर सजवला होता. ज्याला नेहमी सरकारी कंत्राटे दिली जातात त्या ठेकेदाराने हे काम स्वखुशीने केले होते. ऑफिसमधले चार पाच कर्मचारी देखभाल करण्यासाठी ऑफिशियल ड्यूटीवर घरात राबत होते.

रात्री साडेआठला लोक यायला सुरू झाले. सर्व उच्चभ्रू लोकांचा महामेळावा होता तो. कलेक्टरकडे लहान लोक कशाला जातील? सर्वांनी भारी गिफ्ट आणल्या होत्या. कुणी स्कॉच व्हिस्कीची बाटली तर कुणी नोटांनी भरलेले लिफाफे. पाटील आणि शरयू पाहुण्यांचे स्वागत करण्यात मग्न होते. नकली रूंद (वाईड] हास्य कसे द्यावे हे शरयू खूप जाणते.

वातावरण एकदम धूंद बनले होते. लोक मदिरापान करत होते. अगदी हळू आवाजात संगीत चालू होते. चमेली स्नॅक्स सर्व्ह करत होती.पार्टीत रंग भरत होता. आलेला प्रत्येकजण पाटील दांपत्याला भेटून आणि हस्तांदोलन करून बॉबीसमोर जात आणि मोठ्या प्रेमाने अन आदराने झुकून हॅपी बर्थ डे टु यू बॉबी म्हणत होते.

अचानक सर्व लोकांच्या नजरा दाराकडे गेल्या.सौंदर्याची परिसिमा असलेली पाटलांची पीए नेहा आली होती. पाटील आणि नेहा यांची जवळीक हा ऑफिसमधे गॉसिपिंगचा हॉट टॉपिक होता. तिने दोघंना आणि बॉबीला विश केले. बॉबीला उचलून घेऊन ती पाटील आणि शरयूकडे आली. बॉबीने आपले डोके नेहाच्या गालावर स्थिरावले होते. नंतर झालेला संवाद असा:-

  नेहा:- सर, बॉबी मधे आपले गुण पुरेपूर उतरले आहेत.
पाटीलः-कसे काय?
नेहा:-तो अगदी आपल्या सारखाच मधाळ नजरेने माझ्याकडे सारखा बघतोय. नेहाने फिरकी घेतली
परिस्थिती अशी होती की बॉबी आणि पाटील नेहाकडे एकटक बघत होते. नेहा पाटलांकडे बघत होती. आणि शरयू रागाने लाल होत चालली होती
नेहा:- सर, आज बॉबीला किती वर्षे पूर्ण झाली?
पाटीलः- आज बॉबीला सहा वर्षे पूर्ण झाली. आजपासून सातवे लागले त्याला.
नेहा:-खरेच सर! खरं नाही वाटत. किती क्यूट दिसतोय बॉबी! वाटतय की बॉबी फारतर  दोन तीन वर्षाचा असावा.
पाटीलः- तुझ्या सारखाच आहे तो. तू तरी कुठे वाटतेस ४८ वर्षाची? ३५ वर्षाची असल्या सारखी दिसतेस. नेहाने घेतलेल्या फिरकीचा पाटलांनी हिशोब चुकता केला. इतक्यात फोन खणाणला. वाजणार्‍या रिंगवरून वाटत होते की तो लाँग डिस्टन्स कॉल असावा.
पाटील रिसिव्हर उचलतात आणि फोन भोसले यांचा असतो. पाटील आणि भोसले एकाच बॅचचे आय.ए.यस, आधिकारी.पाटील यांच्या मनात सल असतो की भोसले राजकीय नेत्यांची शिडी वापरून पुढे गेले आणि चीफ सचिव झाले. भोसले राज्यासाठी जागतिक बँकेशी कर्जाच्या वाटाघाटी करण्यासाठी यु.यस. ए. ला गेलेले असतात. जेंव्हा जेंव्हा आपण पैशाची  भीक मागतो तेंव्हा याला लोन निगोसिएशन असे गोंडस नाव देतो.
भोसले:- हॅलो पाटील साहेब! मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे टु बॉबी.
पाटीलः-धन्यवाद भोसले साहेब.
शरयू:- कुणाचा फोन आहे?
पाटीलः- भोसलेसाहेबांचा. न्यूयॉर्कहून
शरयू:- इकडे द्या. मी बोलते त्यांच्याशी. हॅलो भोसले साहेब! मी शरयू बोलतेय. कसे आहात आपण?
भोसले:-मजेत एकदम. आपणास बॉबीच्या वाढ दिवसाच्या हर्दिक शुभेच्छा.
शरयू:- मला काय शुभेच्छा देताय? बॉबीशी बोला. मी फोन त्याच्या कानाजवळ धरते.
भोसले:- हेलो! हॅपी बर्थ डे बॉबी. हॉऊ आर यू?
शरयू:-भोसले साहेब, बॉबी फार हुशार आहे. आपला आवाज त्याने ओळला.  
भोसले:- माझा आवाज बॉबीने ओळखल्याचे तुम्हाला कसे कळाले शरयू वहिनी?
शरयू:- आवाज ऐकताच  तो उभा रहिला आदराने आणि शेपूट हलवतोय सारखा.
भोसले:- माय गॉड! मला पण त्याची खूप आठवण येते.
शरयू:- सहाजिक आहे. त्याचे  कूळ डॉबर...... भोसले फोन कट करतात. कारण त्यांनी हे कूळ प्रकरण शरयू कडून आधी बर्‍याच वेळा ऐकलेले असते.

मी पण निमंत्रित पाहुणा म्हणून हजर होतो. एका कोपर्‍यात बसून चाललेला सर्व प्रकार बघत होतो. अचानक माझ्यातिल मध्यमवर्गीय माणूस जागा झाला. मनात आले की भोसले आमेरिकेतून फोनवर अर्धा तास गप्पा मारतात आणि तेही एका कुत्र्याच्या वाढदिवसासाठी! किती खर्च झाला असेल पैसा जो शेवटी सरकारी तिजोरीतूनच जाणार. मला रहावले नाही. मी माझी तळमळ शेजारच्या माणसाला बोलून दाखवली. तोही कदाचित सनदी आधिकारी असावा. त्याने मलाच उलटे समजावायला सुरुवात केली. सरकार तर पैशाचा अपव्यय करतच असते. गरीबांना स्वस्त दराने धान्य देणे, पूरग्रस्तांना मदत, शेतकर्‍यांना स्वस्तात वीज हा पैशाचा अपव्यय नाही तर काय आहे? आय ए यस ऑफिसरच्या कुत्र्याचा एवढा पण हक्क नसावा का की सरकारी खर्चाने हर्दिक शुभेच्छांचा फोन यावा? प्रत्येक दिवसाचं आपलं आपलं महत्व असतं.आता माझच बघा! आज दुष्काळग्रस्त लोकांना कशी आणि किती मदत करावी या बाबत एक मिटींग होती.मी ती सोडून इकडे आलो आहे. कारण आजचा दिवस बॉबीचा आहे. बॉबीचा वाढदिवस तर वर्षातून एकदाच येतो ना! हा सारा त्याचा उपदेश मी निमूटपणे ऐकून घेतला. दुसरा मार्गच नव्हता.

अशा रितीने ही रंगलेली पार्टी साडेदहापर्यंत चालली. सर्व लोक निरोप घेऊन जायला आकरा वाजले. चमेलीला नंतर खूप काम होते.प्लेट्स, ग्लासेस उचलणे, टेबल साफ करणे. सगळी आवराआवर तिलाच करायची होती. हे करायच्या आधी एका कोपर्‍यात बसून जेवण करत होती. दोन घास खाल्ले नाहीत तोच शरयूने तिला बोलावले. शरयूने तिला पाय दाबून देण्यास सांगितले. बिचारी चमेली. पाय चोपून उरलेले जेवण, आवरणे सारे उरकून एका सतरंजीवर तिने अंग टाकले तेंव्हा पहाटेचे दोन वाजले होते.

जेंव्हा चमेलीने बर्थ डे पार्टी पाहिली तेंव्हा तिच्या मनात विचार  आला की हे देवा! मला गरीब घरात मुलगी म्हणून जन्म देण्या ऐवजी एखाद्या सनदी आधिकर्‍याकडे बॉबी का नाहीस बनवले? रस्त्यावरच्या बेवारस कुत्र्यांच्या हक्क रक्षणासाठी सुध्दा सोसायटी  फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी टु अ‍ॅनिमल्स आणि फ्रेंड्स ऑफ डॉग्ज सोसायटीज आहेत. पण माझ्या सारख्या गुलामगिरीत खितपतणार्‍या मुलीसाठी कांहीच संरक्षण का नसावे? जेथे माझ्या जन्मदात्या पित्यानेच मला या नर्कात ढकलले आहे तेथे दुसर्‍या कडून काय अपेक्षा ठेवावी?

छोट्य गुडियाचे डोळे पाणावले ज्यांना पुसणारे कोणीच नव्हते. तिनेच डोळे पुसले सतरंजीवर आडवी झाली. श्रमाने अर्धमेले झालेल्या शरीराला केंव्हा झोप आली ते तिला कळलेच नाही.

चमेली गाढ झोपेत असतानाच शरयूने आवाज दिला आणि चमेलीला उठवले. बॉबीला फिरायला न्यायची वेळ झाली होती. चमेलीची झोपही पूर्ण झाली नव्हती. डोळे चुरचुरत होते. तसेच स्वतःला सावरत बॉबीची साखळी पकडली आणि निघाली कंपाऊंड बाहेर. शरयूने पुन्हा आवाज दिला. चमेली! बॉबीला जास्त फिरऊ नकोस आज. कालच्या पार्टीमुळे तो खूप थकलाय गं! शरयूला बॉबी थकला असण्याची जाण होती. पण चमेलीचे थकणे तिच्या खिसगणतीतही नव्हते.

चमेली हे एका फुलाचे पण नाव आहे. फूल उमलते तेंव्हा सगळीकडे सुगंध दरवळतो. नंतर फूल सुकून निर्माल्य होते.पण ही चमेलीची कळी उमलेल ना? का उमलायच्या आधीच तिचे निर्माल्य होईल?

माझ्या विमनस्क मनात कधी कधी प्रश्नांचे वादळ निर्माण होते.चमेलीला एखादा राजकुमार भेटेल? अगदी स्वप्नातील राजकुमार! जो तिची या यातनामय जीवनातून सुटका करेल. उत्तरे नसणार्‍या प्रश्नात पण मला कुठेतरी दूर धूसर आशावाद दिसतोय. देवाची तिला कृपादृष्टी लाभो.





 निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



Wednesday, February 3, 2016

गालावरची खळी

गालावरची खळी--- (एका व्हाट्स अ‍ॅप समूहावर चित्रावरून कविता लिहा या उपक्रमात माझा सहभाग)

भार नथीचा नकोस पेलू
नको रत्न पोवळी
खरा दागिना लोभसवाणा
गालावरची खळी

असून स्वर्गातली अप्सरा
उतरलीस भूतळी!
तुझीच चर्चा करते हल्ली
काव्य रसिक मंडळी

तुला पाहुनी असे वाटते
पूर्ण उमलली कळी
पाय घसरुनी उत्सुक जो तो
सोडाया पातळी

सौंदर्याची तुझ्या त्सुनामी
माजवते खळबळी
कुणी झिंगतो पीण्याविन तर
करुन कुणी निर्जळी

सौंदर्याची ताकद तुझिया
आहे  किती आगळी!
तुला हवे ते कोणाच्याही
उतरवतेस तू गळी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Tuesday, February 2, 2016

हेच मनाला उमजत नाही---

-( माझ्या एका मित्राचे उतारवयातील भयावह एकलकोंडे जीवन पाहून सुचलेली कविता )

भरकटणार्‍या मनास वेड्या
कांही केल्या समजत नाही
कुणीच नसते जगात अपुले
हेच मनाला उमजत नाही

आयुष्याचा प्रवास करता
व़ळणावरती खूप भेटले
चार दिसांची संगत ठरली
स्वार्थ साधता निघून गेले
उजाड रस्ता रखरखणारा
कांही केल्या संपत नाही
कुणीच नसते जगात अपुले
हेच मनाला उमजत नाही

वृक्ष वाळता उडून गेले
पक्षी अपुल्या ध्येय दिशेने
शुन्यामध्ये नजर लाउनी
काय बघावे? ईश्वर जाणे
उजाड घरटे तरी कालची
प्रसन्न किलबिल विसरत नाही
कुणीच नसते जगात अपुले
हेच मनाला उमजत नाही

दगड विटांच्या घरासवे या
नाते होते किती वेगळे!
इथेच मी अनुभवले होते
सुखदु:खाचे कैक सोहळे
आठवणींच्या जळमटांस या
काळ कधी का हटवत नाही?
कुणीच नसते जगात अपुले
हेच मनाला उमजत नाही

मीच अताशा करू लागलो
तिरस्कार माझा इतका की!
चिमटीमधुनी सर्व निसटले
असून गर्दी, मी एकाकी
विणलेल्या रेशिम धाग्यातिल
कसा एकही उसवत नाही?
कुणीच नसते जगात अपुले
हेच मनाला उमजत नाही

जन्मताच मी रडलो होतो
अंतक्षणी पण पुन्हा आसवे
अंतरास दोन्ही घटनांच्या
जीवन ऐसे नाव असावे
पुनर्जम घ्यावया तरीही
मना वाटते हरकत नाही
कुणीच नसते जगात अपुले
हेच मनाला उमजत नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yah00.com