Monday, September 14, 2015

झोपडपट्टी एक निवडली

कॅमेरा अन् गॉगल घेउन
भल्या पहाटे कार दवडली
अतीव दारिद्र्यास जाणण्या
झोपडपट्टी एक निवडली

प्रवासात गाणी गुणगुणणे
चविष्ट नाश्ता बदल म्हणोणी
मनाजोगती केली होती
फोटोग्राफी स्पॉट बघोनी
अधुनी मधुनी दारिद्र्यावर
चर्चा होती मस्त घडवली
अतीव दारिद्र्यास जाणण्या
झोपडपट्टी एक निवडली

घडली चर्चा सायंकाळी
विविध स्तरातिल तफावतीची
खंत वाटली समाजातल्या
मुल्यामधल्या गिरावटीची
रिलॅक्स थोडे होण्यासाठी
एक बाटली पूर्ण रिचवली
अतीव दारिद्र्यास जाणण्या
झोपडपट्टी एक निवडली

वीकएंड छानसा संपला
फोटो अल्बम तयार केला
सामाजिक बांधिलकीचाही
कुणी बांधला कुणास शेला?
व्हाट्सॅप आणि फेसबुकावर
खूप खूप लाइक्स मिळवली
अतीव दारिद्र्यास जाणण्या
झोपडपट्टी एक निवडली

ज्यांची ओळख नसे सुखांशी
दु:ख तयांना कधी न छळते
परिस्थितीने जसे ठेवले
समाधान त्यातच आढळते
झोप घ्यायची सुखाविना ही
रीत चांगली इथे रुजवली
अतीव दारिद्र्यास जाणण्या
झोपडपट्टी एक निवडली

लॉयन्स क्लब अन् रोटरीसही
अधुनी मधुनी पान्हा फुटतो
जो तो खाऊ देउन आम्हा
धर्मराज स्वतःस समजतो
गरीब असुनी आम्ही त्यांची
भूक मानसिक सदा शमवली
अतीव दारिद्र्यास जाणण्या
झोपडपट्टी एक निवडली


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, September 12, 2015

विचार केला

हार जाहली, काळापुढती
रहावयाचा थरार केला
तिने शेवटी कोषामध्ये
परतायाचा विचार केला

आली होती, हवा मोकळी
घ्यावयास ती बंड करोनी
क्षितिजालाही कवेत घ्याया
मस्त निघाली श्वास भरोनी
चौकट तोडुन कुठे जायचे?
विचार होता त्रिवार केला
तिने शेवटी कोषामध्ये
परतायाचा विचार केला

कोर्‍या पाटीवरती नवखा
आशय होता लिहावयाचा
जुनी जळमटे सोडत मागे
विचार होता उडावयाचा
परंपरेच्या जोखडावरी
वज्रमुठीने प्रहार केला
तिने शेवटी कोषामध्ये
परतायाचा विचार केला

व्यक्त कराया दु:ख, वेदना
मुक्त छंद ती लिहू लागली
गतकालाची जीर्ण लक्तरे
वेशीवरती तिने टांगली
एल्गाराच्या सागरातल्या
लाटांसंगे विहार केला
तिने शेवटी कोषामध्ये
परतायाचा विचार केला

ध्येय छतावर चितारलेले
तिला दिसाया स्पष्ट लागले
काच बिलोरी परंपरांचा
मधेच आहे तिला न कळले
ध्येय दिसावे, मिळू नये पण
असा कुणी हा प्रकार केला?
तिने शेवटी कोषामध्ये
परतायाचा विचार केला


कचखाऊ मन बंधनातले
साथ देइना, वळती झाली
सुरू व्हायच्या अधी लढाई,
चुकचुकलेल्या होत्या पाली
खिन्न मनाने गुदमरासवे
जगावयाचा करार केला
तिने शेवटी कोषामध्ये
परतायाचा विचार केला


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Saturday, September 5, 2015

भीक सावली मागत आहे


कुणीच नाही जगी स्वयंभू
देव, भक्तगण शोधत आहे
सूर्य कटोरी धरून हाती
भीक सावली मागत आहे

गंध फुलांचा पसरायाला
झुळझुळणारी हवा लागते
तृणपात्याविन दवबिंदूंचे
चमचमणेही दिसले नसते
एक श्रेष्ठ अन् कनिष्ठ दुसरा
कोण विकृती पोसत आहे?
सूर्य कटोरी धरून हाती
भीक सावली मागत आहे

काय करावे, करू नये या
संभ्रमात जो अडकत असतो
अशाच वेळी कृष्ण अर्जुना
कसे जगावे? सांगत असतो
उजेड अंधाराच्यासंगे
एकार्थाने नांदत आहे
 सूर्य कटोरी धरून हाती
भीक सावली मागत आहे

रामाच्या प्रतिमेस उजळण्या
पापी रावण पाहिजेच ना !
पाच पांडवा विरुध्द कौरव
महाभारती पाहिलेच ना !
परस्परविरोधी घटकांनी
वाढवलेली रंगत आहे
सूर्य कटोरी धरून हाती
भीक सावली मागत आहे

स्वयंभूपणा तसे पाहता
एक कल्पनाविलास आहे
ध्येय काल्पनिक ऊंच एवढे !
अशक्य उडणे परास आहे
हातमिळवणी सर्व जनांची
खासी अंगत-पंगत आहे
सूर्य कटोरी धरून हाती
भीक सावली मागत आहे


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com