Sunday, April 26, 2015

तुला भेटण्यासाठी



आठवणींच्या धुक्यात रमलो
"आज" विसरण्यासाठी
गंधकोषही शोधशोधले
तुला भेटण्यासाठी

जणू उमलती फूल पाकळी
तसा चेहरा ताजा
तुला एकदा फक्त पाहिले
मी ना उरलो माझा
अशीच केंव्हा पुन्हा भेट ना!
वेड लावण्यासाठी
गंधकोषही शोधशोधले
तुला भेटण्यासाठी

आसपास तू नसून सुध्दा
चाहुल का जाणवते?
भास आहे हे कळल्यावरती
मन वेडे बावरते
कपारीस का निवडलेस तू?
मनात लपण्यासाठी
गंधकोषही शोधशोधले
तुला भेटण्यासाठी

चोरीला मन गेलेले पण
धडधड आहे बाकी
प्याले रिचवुन होश उडवण्या
असावीस तू साकी
आयुष्याच्या मैफिलीत ये
रंग उधळण्यासाठी
गंधकोषही शोधशोधले
तुला भेटण्यासाठी

एकमेव अन् चिरंजीव जे
स्वप्न मिळाले मजला
जोजावत मी त्या स्वप्नाला
लिहितो कविता, गझला
शब्द वेचतो, रचनांमधुनी
तुला गुंफण्यासाठी
गंधकोषही शोधशोधले
तुला भेटण्यासाठी

वेड लागले, वहावलो मी
अशीच माझी ख्याती
ध्यास लागणे, हरवुन जाणे
प्रेमजगीची नीती
प्रेमाविन  का जगावयाचे?
शतदा मरण्यासाठी
गंधकोषही शोधशोधले
तुला भेटण्यासाठी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, April 4, 2015

बरा चालला होता



देवदयेने बधीरतेचा
शाप लाभला होता
विरहामध्ये वेळ म्हणोनी
बरा चालला होता

कोण जीवनी आले गेले
दु:ख मला ना त्याचे
एकच होती आस मनाला
चालत रहावयाचे
कधी कारवा, कधी एकटा
सराव झाला होता
विरहामध्ये वेळ म्हणोनी
बरा चालला होता

नवपानांना नवकिरणांची
सुरेख आभा असते
पर्णहीन वठल्या वृक्षांची
अपुली शोभा असते
क्षण आले ते जगावयाचा
चंग बांधला होता
विरहामध्ये वेळ म्हणोनी
बरा चालला होता

एक समस्या, दुसरी, तिसरी
लांब साखळी असते
यक्ष प्रश्न बनल्या विरहाची
गोष्ट वेगळी असते
शोधशोधल्या उत्तरातही
प्रश्न गवसला होता
विरहामध्ये वेळ म्हणोनी
बरा चालला होता

चार दिसांची संगत आता
काच गळ्याचा ठरली
भुताटकी मग आठवणींची
आसपास वावरली
आत उसासे, आनंदाचा
लेप लावला होता
विरहामध्ये वेळ म्हणोनी
बरा चालला होता

पूर्वेकडुनी पश्चिमेकडे
प्रवास सरकत आहे
विरह भावनेला ठसठसत्या
अजून बरकत आहे
वळणावळणावर जगण्याचा
शाप भोवला होता
विरहामध्ये वेळ म्हणोनी
बरा चालला होता


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com